मुलांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता रुजवणे आवश्यक : डॉ अनिल झोपे
चोपडा येथे रोटरीचा नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा उत्साहात

चोपडा: आपण जे पेरतो ते शतपटीने उगवते म्हणून पेरणी करताना अधिक सावध असले पाहिजे. शिक्षक वर्गातील मुलांच्या मनात संस्कार, चांगुलपणा आणि ज्ञानाची बीजे रोबत असल्याने शिक्षकांनी आपले काम करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. आईच्या भूमिकेत शिरूर शिक्षकाने आपले काम केल्यास कुठल्याही प्रशिक्षणाची गरज पडणार नाही. मुलांची शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढवत असतानाच भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजासाठी काम करण्याची वृत्ती जोपासली जाते असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य डॉ. अनिल झोपे (जळगाव) यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे रोटरी भवन येथे आयोजित ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ वितरण सोहळ्याप्रसंगी मंचावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, मानद सचिव विश्वास दलाल, सहप्रांतपाल पंकज बोरोले, प्रकल्प प्रमुख महेंद्र बोरसे, सहप्रकल्प प्रमुख जगदीश महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष रोटे. आशिष जयस्वाल यांनी तर सूत्रसंचालन भालचंद्र पवार यांनी केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय संजय बारी यांनी करून दिला तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय लीना पाटील व जगदीश महाजन यांनी करून दिला. आभार प्रदर्शन रोटरीचे मानद सचिव विश्वास दलाल यांनी केले. पंकज नागपुरे, संजय नेवे, रोहिणी कापडणे, गायत्री शिंदे व उमेश बाविस्कर या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी गुणवत्ता आणि कार्याला न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा समाज सुजाण असतो. शिक्षक हेच काम करत असून अशा शिक्षकांचा रोटरीतर्फे गौरव होत आहे ही अभिनंदनीय बाब आहे, असे मनोगतात सांगितले.

नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त शिक्षक :
नरेंद्र भावे (विवेकानंद विद्यालय), पंकज नागपुरे (प्रताप विद्या मंदिर), सिमी मोलाथान (चावरा इंटरनॅशनल स्कूल), रोहिणी कापडणे (बालमोहन विद्यालय), फरहत शेख (चावरा वंडर किड्स), गायत्री शिंदे (पंकज विद्यालय), रतिलाल सोनवणे (सी. बी. निकुंभ हायस्कूल घोडगाव), राजेश सैंदाणे (आर एच पाटील माध्यमिक विद्यालय वढोदा), स्वप्नील पाटील (कुरवेल हायस्कूल), मोनेश बाविस्कर (केंद्रप्रमुख लासुर), भास्कर धनगर (जि प शाळा विटनेर), उमेश बाविस्कर (जि. प. शाळा उनपदेव), रंजना सपकाळे (जि प शाळा अनुवर्दे), विकास पाटील (आश्रमशाळा कर्जाणे), संजय नेवे (ललित कला केंद्र), प्रा. प्रशांत गोड, नुसरतजहाँ रियाजोद्दीन (चावरा इंटरनॅशनल स्कूल) यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगदीश महाजन, भालचंद्र पवार, पंकज बोरोले, विश्वास दलाल, विलास पी. पाटील, संजय बारी या रोटरी सदस्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय, अनेक शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

