चोपडा नगरपरिषद निवडणूक : अपक्षांचे घोडेबाजार तापला!
माघारीपूर्वी लगबग, पैशांचे आमिष आणि आश्वासनांची बरसात
चोपडा प्रतिनिधी : सचिन जैस्वाल
चोपडा नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीची तारीख २१ नोव्हेंबर जरी निश्चित असली, तरी त्याच्या आधीच प्रत्येक वार्डात अपक्ष उमेदवारांच्या घोडेबाजाराला उधाण आले आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रत्यक्ष सत्ता मिळवू शकत नसला, तरी पक्षाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का देण्याची त्यांची क्षमता मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, माघारीच्या आदल्या रात्री अनेक अपक्ष उमेदवारांना विविध पक्षांकडून माघारीसाठी साकळे घातले जात आहेत. काहींना आर्थिक आमिष तर काहींना “पुढच्या निवडणुकीत तुमची उमेदवारी पक्की” असे राजकीय आश्वासन देऊन राजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला अतिरिक्त रंग चढला आहे.

युतीचा ‘साइड-इफेक्ट’: राष्ट्रवादी–भाजपमधील नाराजी उफाळली
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ही अंतर्गत नाराजी दोन्ही पक्षांसाठी निवडणुकीत मोठी अडचण ठरू शकते, अशी चर्चा शहरभर जोरात आहे.
दरम्यान, निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेतृत्वाने अनेक इच्छुकांना विश्वासात न घेताच युती अंतिम केल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
*अंतर्गत बंडाचा फटका कुणाला?*
पक्षांतर्गत वितुष्ट, अपक्षांची चलती, माघारीसाठी सुरू असलेली पळवापळव… या सगळ्यामुळे चोपडा नगरपरिषद निवडणुक अधिकच रंजक बनली आहे.
अंतर्गत नाराजीचा फटका अखेरीस कुणाला बसतो आणि अपक्षांच्या घोडेबाजाराचा प्रकाशझोत कोणावर पडतो, हे येणारे काही दिवस निश्चित करणार आहेत.

