घडताना बिघडताना इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी चा उपक्रम विवेकानंद विद्यालयात यशस्वी
चोपडा (प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी नागोठाणे येथील लेखक निवेदक व शैक्षणिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील प्रेरक प्रशिक्षक निवृत्त इंजिनियर ज्येष्ठ रंगकर्मी मानसशास्त्र व शिक्षण शास्त्र याचे गाढे अभ्यासक संजय गोविलकर यांनी आयुष्य घडवणारा कार्यक्रम “घडताना बिघडताना ” अतिशय सुंदर रित्या सादर करत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक केले.

या उपक्रमात त्यांनी इयत्ता नववी दहावीत शिकणारा तुमचा मुलगा खरंच अभ्यास करतो का? अभ्यास म्हणजे काय करतो? क्रमिक पुस्तक वाचतो समजून घेतो की गाईड पाठ करतो ?तुमच्या मुलाला भरपूर मार्क्स मिळवावेत असं वाटते का? दहावीला 90 / 95 टक्के मार्क्स मिळवणारा मुलगा बारावीत 70 / 75 टक्के पर्यंत का घसरतो . तुमचा मुलगा नुसता परीक्षेत नाही तर आयुष्यातही यशस्वी व्हावा असे तुम्हाला वाटते का? आताच्या काळात नुसतच परीक्षार्थी होऊन स्पर्धेला तोंड देता येणार आहे का? आता आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे? हे सगळं या उपक्रमातून व्यवस्थितपणे स्लाइट्स व रंजक व्हिडिओ च्या माध्यमातून दाखले व उदाहरण देत समजावून सांगत मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजनाने झाली . मार्गदर्शक वक्ते .संजय गोविलकर यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अॅड. रवींद्र जैन ,सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर ,विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे ,प्राचार्य सुरेखा मिस्तरी, मुख्याध्यापिका आशा चित्ते मॅडम यांच्यासह विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवनलाठी यांनी केले.

