शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणामुळेच शिक्षकांना कोरोनाची लागण..
शासनच जबाबदार..
गोरगावले बु.”रामाई”चे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती..
चोपडा (प्रतिनिधी) शासनाच्या शिक्षण विभागाने मागील महिन्यात प्राथमिक, माध्यमिक, खाजगी शाळेतील शिक्षकांना शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणाचे काम लावले होते.एकेक शिक्षकाला शेकडो परिवारांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचा आदेश दिला होता. हा आदेशच शिक्षकांसाठी तुघलकी व घातकी होता.त्याला राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोधही केला,पण या नाकर्त्या, नतद्रष्ट, हुकमी शासनाने ऐकले नाही. त्याचा परिणाम प्रत्येक तालुक्यातील शेकडों शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली.पर्यायाने कोरोनाबाधीत शिक्षकांचे संपुर्ण परिवारही बाधीत झालेत.

काहिंना आपल्या आईवडिलांसह स्वतचा जीवही गमवावा लागला आहे. ह्यामुळे भावी पिढी घडविणार्या शिक्षकांचीच कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. याला सर्वस्वी शासनाचा शिक्षणविभागाच जबाबदार आहे. अशी स्पष्टोक्ती गोरगावले बु.रा.मा.विद्यालयाचे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी केली आहे.
शिक्षक हे कोरोना योद्धाच आहेत. ज्या शिक्षकांचे कोरोनामुळे दुःखद निधन झालेले आहे,त्यांना शासनाने तात्काळ रू.५० लाखांची मदत दिली पाहिजे. अजूनही शेकडों शिक्षक आपल्या परिवारासह सरकारी, खाजगी दवाखान्यात मरणयातना सहन करीत आहेत. अजुनही काहींना होमक्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे.त्यांची तात्काळ मेडिकल बिले मंजूर करण्यात यावीत.तसेच मयत शिक्षकांच्या परिवारातील वारसांना अनुकंपा तत्त्वानुसार तात्काळ नोकरी दिली पाहिजे.अशीही आग्रही मागणी जळगांव ग.स.कर्मचारी पतसंस्था (स्टाफ् सोसायटी)चे संचालक जगन्नाथ बाविस्कर(चोपडा)यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
