दोन बिसलरीच्या पाण्याच्या बाटल्यां एवढा भाव प्रति लिटर दुधाला मिळत आहे , शेतकऱ्यांनी मरावे की जगावे सुमारे दुपटीने तोटा: उत्पादन खर्च ५५ रुपये तर दुधाला मिळतायेत ३६ रुपये

चोपडा प्रतिनिधी :—- कोरोनाची दुसरी लाट, त्यामागून आलेली टाळेबंदी याच्या फायदा उचलत बाजारात मागणी नसल्याच्या कांगावा करत दुधाचे दर कमी केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात दुधाला प्रति लिटर उत्पादन खर्च एवढा देखील दर सध्या दुधाला मिळत नाही .प्रति लिटर मागे १० रुपये जरी दर वाढला तरी प्रति लिटर उत्पादन खर्चाशी बरोबरी करत नसल्याचे वास्तव आहे. १९७३ साली सरकारने दुधाच्या उत्पादन खर्च काढण्यासाठी देवताळे समिती तर १९८२ साली निलंगेकर समिती नेमली होती. निलंगेकर समितीच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१८/ १९ मध्ये दुधाचे उत्पादन खर्चाचे गणित मांडले होते. या अहवालानुसार गाईच्या प्रति लिटर दुधाच्या उत्पादन खर्च ४१ रूपये ७७ पैसे तर म्हशीच्या प्रति लिटर दुधाच्या उत्पादन खर्च ७४ रुपये ५५ पैसे एवढा निर्देशित केला आहे.

या अहवालामध्ये समाविष्ट केलेल्या निविष्ठांचे दर २०१८/१९ च्या तुलनेत दोन वर्षात वाढले आहेत. त्यामुळे सध्याच्या निविष्ठांच्या दरानुसार दुधाच्या प्रति लिटर उत्पादन खर्चात वाढ होणार आहे .परिणामी या अहवालानुसार दुधाच्या उत्पादन खर्च एवढा देखील सध्या दुधाला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. १५ एप्रिल २०२१ पासून ३.५ फॅट व ८.५ एस एन एफ असणाऱ्या गाईच्या दुधाला २५ रुपये दर दिला जात आहे. यामध्ये काही दिवसात २ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसात हा दर २३ रुपयांवर येणार आहे. अनेक खासगी व्यवसायिक तसेच सहकारी संस्थांनी अध्यादेशाला फाट्यावर मारले आहे.

सरकारी अध्यादेश न मानता मनमानी पद्धतीने दूध उत्पादकांची पिळवणूक केली जात आहे .दुध दर कपातीचे खाजगी व्यवसायिक नेहमी दूध पावडरच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घसरणीचे कारण देत असतात .प्रत्यक्षात हेच व्यवसायिक दुधापासुन कमीत कमी २० च्या वर दुग्धजन्य उपपदार्थांची निर्मिती करतात .त्यामध्ये पॅकिंग, दुधापासून खवा, लोणी, मिठाई, मठ्ठा, सुगंधी दूध, पनीर, तूप, दही अशी यादीच तयार होते. सहकारी संस्थांवर संचालक म्हणून बसणारे बहुतांश खाजगी दूध व्यवसायिकांची संबंधित आहे , त्यामुळे खाजगी दूध व्यवसायिकांनी खरेदी दरात कपात केली, सहकारी दूध संघ त्यांची 'री' ओढताना दिसतात . एकीकडे केंद्र सरकार शेताच्या खासगीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल असे गणित मांडत आहे मात्र दुग्ध व्यवसायाचे खाजगीकरण होऊन सुद्धा दूध उत्पादकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

प्रत्यक्षात राज्य सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत मात्र प्राप्त परिस्थितीचा फायदा उचलत दूध संस्था दूध उत्पादकांची पिळवणूक करत आहेत याचा फायदा सहकारी दूध संघाकडून देखील उचलला जात आहे .दूध उत्पादकांची पिळवणूक थांबवा अन्यथा शेतकरी संघटना दूध उत्पादन उत्पादकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील , उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर ,जिल्हाध्यक्ष संजय महाजन ,सचिन सचिन चोपडा , अखिलेश पाटील भडगाव, सय्यद देशमुख जळगाव ग्रामीण ,मंगेश राजपूत अमळनेर, खुशाल सोनवणे एरंडोल ,नामदेव महाजन पाचोरा, जीवन चौधरी यावल यांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
एक लिटर बिसलरी पाणी बनवण्यासाठी पॅकिंग सहीत तीन रुपये खर्च येतो मात्र बाजारात बिसलरी 20 रुपये लिटर दराने मिळते एक लिटर दुधाला 35 रुपये उत्पादन खर्च येतो मात्र त्याच्या दर 42 रुपये मिळतो हे अन्यायकारकच आहे. उत्पादन खर्च अधिक दीड पट नफा हे सरकारने आश्वासन देऊनही त्याप्रमाणे सरकार उत्पादनखर्चावर दुधाचे दर निश्चित करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा
संदीप आधार पाटील
शेतकरी संघटना माजी जिल्हाध्यक्ष, जळगाव

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना गाई-म्हशी पाळणे आता जिकरीचे झालेले आहे कारण की ढेपचे दर गगनाला पोहोचले आहेत .चाराचे दर चार हजार रुपये शेकडा व असेच जर सर्वच भाव वाढत गेले तर शेतकऱ्यांनी गाई ,म्हशी पाळाव्यात का ? असा प्रश्न निर्माण होत आहे . दुधाला तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये लिटर भाव देतात
हे कितपत योग्य आहे असेच जर चालत राहिलं तर शेतकरी राजाने गाई – म्हशी पाळाव्यात की नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे?
किरण गुर्जर
दूध उत्पादक शेतकरी














